पृष्ठे

Friday, August 17, 2012

बैल पोळा

बैल पोळा
श्रावणाची समाप्ती दर्श पिठोरी अमावास्येने होते. हीच अमावास्या कृषी संस्कृतीची महती सांगणारी आहे. ही महती पोळ्याच्या सणाने प्रचलित झालेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती कृषिप्रधान आहे. काळ्या आईचे लेकरू असलेल्या शेतकर्‍याला पदोपदी मदत करणारा बैल हाच खरा साथीदार असतो. बैलाच्या खुराने शेती केल्यास खोर्‍याने समृद्धी येते असे मानले जाते. बैलाच्या कष्टाची महती सांगणारा पोळा हा सण होय. ग्रामीण भागात कृषिप्रधानता असल्याने दिवाळीखालोखाल पोळ्याच्या सणाला अतिव महत्त्व आहे.
पोळ्याचा सण यापूर्वी पाच दिवस पाळला जायचा. पुढे तो तीन दिवसांवर सीमित झाला. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलास नदीवर किंवा गावतळ्यावर नेऊन त्याची खांदेमळणी म्हणजे वजरीने (दगडाची चिप) अंग घासून चांगले स्नान घातले जायचे. नंतर तिथेच गोडेतेलाने कान, शिंग व अंगाला माखले जायचे. दुसर्‍या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी दुपारी गावातील वेशीजवळच्या मारुती मंदिरासमोर असलेल्या पोळ्याच्या पटांगणावर सर्जा-राजाला आणून शिंग ते खुरापर्यंत चांगली सजावट केली जायची. सजावटीमध्ये शिंगासाठी शिंग खोबळे किंवा मोजे, कानासाठी झूल, बेगड, नाकातली नथनी किंवा वेसण, गळ्यात घोगर, घुंगरे, गारगोटीची रंगबेरंगी माळ, कवड्यांची माळ, पाठीवर झूल, पायांसाठी फुलांची माळ यासोबतच दोन्ही शिंगांच्या मधोमध टोप आणि मोरपंखांचा पिसारा, शिंगांच्या सजावटीत बेगड, चमकी वापरायची... पाठी-पोटावर गेरूचे छापे, पायातही बेगडीची आरास झाल्यानंतर कुणाची नजर लागू नये म्हणून लिंबू चिरून दोन दिशाला फेकायचे किंवा अंडे ओवाळून दूर फेकले जायचे. तसेच गोटा व कवडी काळ्या दोर्‍यात ओवून ते सर्जा-राजाच्या एका पायात बांधले जायचे. ही सर्व आरास सायंकाळी व्हायची. यासोबतच गावातले पशुपालक आपापल्या बैल जोड्यांनी जमलेले असतात. मग इथेच मानाच्या बैलाची पूजा होते. पोळ्याचा हा पहिला मान मिळविण्यासाठी चढाओढ लागायची. गावातील मुख्य व्यक्ती किंवा सरपंचाच्या वतीने घोषणा होते. यावेळी अटीतटीचा प्रसंग घडतो. अखेर वादावर पडदा पडून पोलिसांच्या बंदोबस्तात पोळा फुटला जायचा. मानाचा बैल पुढे अन् त्यापाठोपाठ इतर बैलजोड्यांचा लवाजमा गावभर फिरायचा.
गावात बैलजोड्या मिरवताना प्रत्येकाच्या घरी बैल आणले की घरातील ज्येष्ठ सवाष्ण गृहिणीच्या हस्ते बैलाची पूजा करायची. बैलाचे पाद्यपूजन, पंचारती, पुरणपोळीचा घास भरवला जायचा. घरोघरी उत्साह संचारलेला, मांगल्य भरलेला हा पोळ्याचा सण असायचा.
साधाणत: पोळा आणि होळीच्या सणाला खास पुरणपोळीचाच नैवेद्य असतो आणि हे दोन्ही सण सायंकाळच्या मुहूर्तावरच साजरे होतात. पुरणपोळीचा पहिला नैवेद्य पोळ्यालाच असतो. बैलघास दिल्यानंतर घरातील सर्वांसोबत सहभोजन करण्याची प्रथा सणाला आहे. विलायची आणि जायफळ घालून गव्हाच्या पिठामध्ये हरभर्‍याच्या डाळीची आणि गावरान गुळाची ही पुरणपोळी गुळाच्या काकवीसोबत फस्त करायची... सोबतच साजूक तूप असायचेच. आज काकवीची जागा दुधाने घेतलीय. पुरणपोळीतही गुळाऐवजी साखर पडली असल्याने सणासोबत खाद्य संस्कृतीही बदलली आहे. मुळात आयुर्वेदानुसार गुळाची पुरणपोळी ही योग्यच आहे.
पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी अमावास्येची कर असते. या दिवशीही बैलांना कामावर जुंपले जात नसे. या दिवशी गावाबाहेर असलेल्या कान्होबा किंवा खंडोबाच्या मंदिरात बैलजोडी दर्शनासाठी नेली जात आहे. या मंदिराच्या परिसरात तोबा गर्दी व्हायची... अन्य पशुपालक तेथे जमायचे. गप्पाटप्पा व्हायच्या. तिथेही मानाच्या बैलावरून थोडी कुरबूर व्हायची. यापुढच्या पोळ्याला मान मिळविण्याचे आश्‍वासन घेऊन वाद मिटायचा. वर्षभर सुखेनैव समृद्धी-शांतता नांदावी असा आशीर्वाद घेऊन मंडळी गावात परतली की मग शेतीच्या पसार्‍याचे वेध लागायचे!
पोळ्याच्या सणाची ही पारंपरिक रूढी अद्याप काही ठिकाणी कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. शेतीची कामे आज यंत्रांनी केली जात असली तरी बैलांना जुंपण्याची प्रथा प्रचलित आहेच. त्यांना पोळ्याच्या सणामार्फत एक दिवस मान देण्याचाच हा सण आहे. शहरी भागामध्ये बैलांचे महत्त्व दुय्यम ठरले आहे. म्हणूनच बाजारात रंगीबेरंगी मातीपासून बनवलेल्या बैलजोड्या घेऊन त्यांचे पूजन केले जाते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे वास्तव वेगळे आहे. शेतीच्या पसार्‍यातच ग्रामीण भागाचा डोलारा उभा आहे. तिथे बैलांचे महत्त्व टाळता येणारे नाही आणि तिथे पोळा सण पाळला जात नाही असे तर घडतच नाही. आज पोळ्याचा सण दोन दिवसांच्या मर्यादेपर्यंत आलेला आहे. या दोन दिवसांच्या विश्रांतीवरच ऊन-पाऊस-थंडीमध्ये ढोरहमाली करणार्‍या बैलांनी कृषीक्षेत्राच्या माध्यमातून श्रमसंस्कृती जोपासली म्हणूनच महादेवाच्या पिंडीसोबत नंदी असतो. पिंडीअगोदर नंदीला दर्शनाचा पहिला मान आहे.
पोळा फुटला की सायंकाळी गावात बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या माळांनी मंजूळ ध्वनी उमटायचा. त्यांच्यासोबत पशुमालकाचे ‘हुर्रऽऽ चॅक्ऽऽऽ हट ऽऽऽ असे आवाज घुमायचे... घरासमोर सजवलेली बैलजोडी केव्हा येईल याची सर्वांनाच उत्सुकता असायची. गल्लोगल्लीत बैलाच्या शेणाचा वास दरवळत असायचा. एरवी टोकदार शिंगांची बैलजाडी जरा सावधतेने हाताळावी लागायची. पण पोळ्याच्या दिवशी अशी भीती राहायची नाही. पुरणाची पोळी तोंडात घातल्यास त्याच्या पाठीवर थाप मारली जायची... आज असे चित्र दुर्मिळ झाले आहे.